Breaking News

भव्य रोजगार मेळाव्याला तुफान प्रतिसाद

आतापर्यंत 7680 जणांना मिळाला रोजगार

पनवेल ः प्रतिनिधी

आपला देश तरुणांचा देश आहे. त्या अनुषंगाने तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी भाजप सरकार काम करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश गतिमान व डिजिटल होत आहे, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज (दि. 8) खांदा कॉलनी येथे केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगार आणि सीकेटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या ’भव्य रोजगार मेळावा 2019’चे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याला उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आदी क्षेत्रांत आदर्श काम करण्याबरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर उल्लेखनीय कार्य करीत आहेत. आज त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा फायदा अनेक तरुणांना होणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपला देश कृषिप्रधान असला तरी देशाला सुजलाम् सुफलाम् बनवण्याची ताकद तरुणांत आहे. त्यामुळे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन योजना आखल्या आहेत. स्कील इंडिया, स्टार्ट-अप इंडिया अशा महत्त्वाकांक्षी योजना देशाच्या प्रगतीस हातभर लावत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. रोजगार, नोकरी करताना ’मी नोकरी देणारा होणार’ ही मनात इच्छा आणि संकल्प करा, असे सांगतानाच रोजगाराच्या संधीबरोबर शेतीसाठीही संधी आहेत. त्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनेत सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारी काम आणि थोडा वेळ थांब, अशी पूर्वीच्या सरकारची परिस्थिती होती, मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सरकारी काम डिजिटलच्या दिशेने वाटचाल करून गतिमान झाल्याचा उल्लेखही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी आवर्जून केला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आपण वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवतो. प्रत्येक दिवशी कार्यक्रम असतात, पण तरुणांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात काम करताना रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न असतो. तो या मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सोडवला जात आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपली नेहमीच धडपड असते. त्या अनुषंगाने सरकारने रोजगाराच्या दृष्टिकोनातून वेग पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार धडाडीने काम करीत आहे. त्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सक्रियतेने काम करीत असल्याचा उल्लेख करून तरुणांनी रोजगार, नोकरी करण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांत सहभाग घ्यावा, असा मार्गदर्शक सल्लाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी युवा पिढीला दिला.

सिडको अध्यक्ष व मेळाव्याचे आयोजक आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोणताही मोबदला न घेता गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा 15वा रोजगार मेळावा असूून आजपर्यंत 7680 जणांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. देशातील सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळावा यासाठी स्कील इंडिया कार्यक्रमावर भर देण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी मानून मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. विमानतळ, जेएनपीटी, एसइझेड व असे इतर अनेक प्रकल्प येथे कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे परिसराचा झपाट्याने विकास होऊन लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले आहे. आपल्या शैक्षणिक कार्यक्षमतेनुरूप रोजगारासाठी तरुणांनी जागरूक राहिले पाहिजे, असे सांगून त्यांनी मेळाव्यातील उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छाही दिल्या.

मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास मेळाव्याचे आयोजक व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, अमर पाटील, नगरसेविका सीता पाटील, सुशीला घरत, कुसुम पाटील, वृषाली वाघमारे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, प्राचार्य वसंत बर्‍हाटे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.     या मेळाव्यात शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, पदवीधर, अभियंता व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकर्‍यांच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सागर माने, अ‍ॅड. चेतन जाधव, चिन्मय समेळ, मयुरेश नेतकर, सीकेटी महाविद्यालय आणि सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply