शोकसभेत पत्रकारांची मागणी
कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 13) कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलिसांना निवेदन दिले. कर्जत येथे झालेल्या शोकसभेत कर्जतमधील पत्रकारांकडून दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान,संतोष पवार यांच्या पश्चात त्यांचे पुत्र मल्हार पवार यांना ‘रायगड माझा’ व ‘महाराष्ट्र न्यूज 24’ या यू ट्यूब वाहिनीच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व पत्रकारांनी शोकसभेत दिले.
कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने रविवारी कर्जत येथील ‘रायगड माझा’ यू ट्यूब वाहिनीच्या कार्यालयाबाहेर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सुरुवातीस विजय मांडे यांनी दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी गायक प्रसादबुवा पाटील, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांच्यासह पत्रकार दिनेश सुतार, विलास श्रीखंडे, रोशन दगडे, भूषण प्रधान यांनी दिवंगत संतोष पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे यांनी पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी व पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देत तत्काळ कारवाई करण्यात येईल असे 9 सप्टेंबर रोजी शासकीय प्रेसनोट काढून घोषित केले होते, मात्र शासनाने पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कोणावरही कारवाई केली नाही. त्यामुळे आपण दिवंगत संतोष पवार यांना न्याय देण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागाच्या संबंधित यंत्रणेवर कारवाई झाली नाही, तर संतोष पवार यांच्या उत्तरकार्यानंतर पत्रकारांनी गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन केले पाहिजे, अशी सूचना केली. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत द्यावी अशी मागणी करावी, अशी सूचना केली. पालकमंत्र्यांना आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यात अपयश आल्याबद्दल पत्रकार संतोष पेरणे यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी संतोष पवार यांचे आपल्यातून जाणे हे शासन यंत्रणेचा चुकारपणा आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला असे सोडून आपण माघार घेतल्यासारखे आहे. त्यामुळे न्यायासाठी आपण आता आंदोलनाची तयारी केली पाहिजे, असे सूचित केले.
ज्येष्ठ पत्रकार आणि शोकसभेचे अध्यक्ष विजय मांडे यांनी सर्वांची सूचना लक्षात घेऊन तत्काळ पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्याच वेळी आपण याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटून दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबाला मदत करण्याबाबत विनंती करू. त्यासाठी मी स्वतः आघाडीवर असेल, असे विजय मांडे यांनी जाहीर केले. माथेरान येथील पत्रकार दिनेश सुतार यांनी संतोष पवार यांच्या पश्चात आपण सर्वांनी पवार यांचे चिरंजीव मल्हार पवार यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी सूचना केली. त्यावर सर्व उपस्थित पत्रकारांनी संतोष पवार यांचे चिरंजीव मल्हार पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. दिवंगत संतोष पवार यांच्यासोबत ‘रायगड माझा’मध्ये काम करणारे रोशन दगडे यांनी ‘रायगड माझा’ आणि ‘महाराष्ट्र न्यूज 24’ वाहिनीचे काम अखंडपणे सुरू राहील, असे आश्वासन या वेळी शोकसभेत दिले. शोकसभेला कर्जत तालुक्यातील 40हून अधिक पत्रकार उपस्थित होते.
पोलिसांना निवेदन सादर
शोकसभेत ठरल्यानंतर तत्काळ दुपारी कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी कर्जतचे पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले, तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना मागणीची तक्रार मेलवरून पाठविण्यात आली. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, रुग्णवाहिका 108मधील डॉ. कांबळे, चालक ऐनकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी पत्रकारांची मागणी आहे.