खोपोली : प्रतिनिधी
वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने खोपोलीतील झेनिथ स्टील कारखान्याच्या वसाहतीचा वीजपुरवठा 7 जानेवारीपासून खंडित केला आहे. त्यामुळे या वसाहतीमधील 72 कुटुंबे अंधारात दिवस काढत आहेत. वीज नसल्याचा परिणाम येथील मुलांच्या शैक्षणिक वाटचालीवर व पाणीपुरवठ्यावर झाल्याने कारखाना व्यवस्थापन हे कृत्य जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप या वसाहतीत राहणार्या कामगारांनी केला आहे.
खोपोली शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा कारखाना म्हणून झेनिथ स्टील कंपनीची ओळख होती, मात्र मागील 15 वर्षांपासून या कारखान्याला घरघर लागली आहे. कारखाना व्यवस्थापनाने 1995 साली 203 कामगारांना कामावरून कमी केले व त्यानंतर 12 डिसेंबर 2013 रोजी व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या टाळेबंदी करून कामगारांना देशोधडीला लावले. कारखान्याच्या वसाहतीत राहणार्या कामगार व कर्मचार्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने त्रास देणे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यवस्थापनाने वीजबिल थकवल्यामुळे कामगार वसाहतीचा वीजपुरवठा 7 जानेवारीपासून खंडित करण्यात आला आहे. या वसाहतीत 72 कामगारांची कुटुंबे आजही वास्तव्य करीत असून त्यांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देऊन बाहेर काढण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्न करीत आहे. महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने येथील कुटुंबे अंधारात दिवस ढकलत आहेत, अशी माहिती राजेंद्र मोहिते, ज्ञानेश्वर पवार, वीरेंद्र रॉय, संजय मोहिते, बजरंग राठोड, रजनी रवणे, गुलाब ठाकरे, गुलाब देशमुख, रेखा बारस्कर, मीना दास यांनी दिली. याबाबत महावितरणला विचारणा केली असता कारखाना व्यवस्थापनाने सुमारे दोन लाखांहून अधिक वीजबिल थकीत ठेवल्याने झेनिथ कामगार वसाहतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
झेनिथ स्टील कामगार वसाहतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली. अंधारामुळे व मुलांच्या परीक्षा सुरू असल्याने शिक्षणावरही परिणाम होतो. अंधारामुळे गर्दुल्ल्यांचा वावर वाढलाय. याबाबत व्यवस्थापनाने मार्ग काढावा.
-राजेंद्र मोहिते, कामगार प्रतिनिधी,
झेनिथ स्टील, खोपोली