Breaking News

नेरळमध्ये अर्धवट रस्त्याच्या पूर्णत्वासाठी उपोषण; नाईक कुटुंबाचे आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा

कर्जत : बातमीदार

रायगड जिपच्या हलगर्जीपणामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून नेरळ गावात बनवण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम दीड वर्षापासून अर्धवट आहे. रस्त्याच्या पूर्णत्वासाठी नेरळच्या खांडा भागातील सुभाष नाईक यांनी सोमवार

(दि. 20)पासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे.

नेरळमधील आठ रस्त्यांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधून मिळालेल्या 22 कोटींच्या निधीतून केली जाणार होती. त्यासाठी रायगड जिपच्या बांधकाम विभागाने नेरळमधील विविध आठ कामे मंजूर करून निविदा काढल्या. त्यात नेरळ टॅक्सी स्टँडपासून कल्याण रस्त्यावरील दिव्या दीप हॉटेल या खांडा गावातून जाणार्‍या रस्त्याचा समावेश होता, मात्र रस्त्याचे काम करणार्‍या मिरॅकल इंजिनिअर कंपनीने काम अर्धवट ठेवले. त्यामुळे वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याचे काम दिव्या दीपपर्यंत असताना त्याच्या 150 मीटर अलीकडेच काम बंद केले. खांडा भागातील रस्त्याच्या कामाबाबत नेरळ विकास प्राधिकरण कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. अर्धवट ठेवण्यात आलेल्या रस्त्याबाबत रायगड जिपही गप्प आहे. रस्त्याचे काम अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे. त्याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

जिप सदस्या अनसूया पादिर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी सुभाष नाईक यांनी उपोषण करू नये, अशी सूचना केली होती, मात्र आपल्याला याबाबत लेखी पत्र द्यावे, अशी सूचना नाईक यांची होती. जिप अद्याप त्याबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी निवेदन देऊ शकले नाही. त्यामुळे सुभाष नाईक यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभांगी, मुलगी दीप्ती, भावना, मुलगा उद्देश हे नाईक कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत. ग्रामस्थांनीही त्यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply