खोपोली : प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीतील हाळ गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात हाळ गावच्या महिलांनी पाणी प्रश्नावरून आमदार सुरेश लाड यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने महिलांच्या दोन्ही गटांत शाब्दिक युद्ध रंगले. त्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली.
खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध प्रभागांत विविध विकासकामांचे उद्घाटन स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड व पालिका अधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. शेवटचा कार्यक्रम हाळ येथे आयोजित होता. या ठिकाणी समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे आ. लाड यांचे मार्गदर्शन होते. 2 कोटी 30 लाख रु.च्या महत्त्वपूर्ण योजनेचे आमदार लाड यांनी उद्घाटन केले व सभास्थानी त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहताच उपस्थित महिलावर्गातून एका ज्येष्ठ महिलेने भाषणात खंड पाडून प्रथम आम्हाला पिण्याचे शुद्ध पाणी द्या. आता पुरवठा होत असलेल्या पाण्यात क्लोरीनचा जास्त वापर केल्यामुळे ते पाणी प्यायल्याने उलट्या सुरू झाल्या. तेव्हा त्याबाबत पहिले बोला असा आग्रह धरला. त्याच वेळेस पाठीमागून अनेक महिलांनी ज्येष्ठ महिलेच्या मागणीला जोरदार पाठिंबा देत मोठ्या प्रमाणात व जोरात गोंगाट केला. तेव्हा आमदार लाड यांनी महिलांना शांत करून तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला पहिल्यासारखे पाणी मिळेल. नवीन योजनेचे पाणी तत्काळ थांबविण्याचे त्यांनी प्रशासनाला सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते हसन जळगावकर, असिफ जळगावकर यांनी उपस्थित महिलांना शांत राहण्याविषयी वारंवार सांगितल्यानंतरही शांत होत नाही तेव्हा हसनभाई चिडले व त्यांनी जोरात शांत राहा, असे सांगितले. दरम्यान, बंदोबस्तावर असणार्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत गडबड करणार्या महिलांना तेथून जाण्यास सांगितले.