मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने 23 ते 25 जानेवारी या कालावधीत 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी
स्पर्धेचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथील रेसिडेन्सियल महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नाशिक विरुद्ध यजमान अहमदनगर, मुंबई उपनगर विरुद्ध सातारा अशा किशोरी गटात, तर पुणे विरुद्ध लातूर आणि रायगड विरुद्ध उस्मानाबाद अशा किशोर गटातील पहिल्या दिवसातील लढती होतील.
या स्पर्धेत किशोर गटात 25 जिल्हा असोसिएशनचे संघ सहभागी होणार आहेत, तर किशोरी गटात नंदुरबार वगळता इतर 24 जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. गतवर्षी अचानक जाहीर झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या तारखांमुळे निवड चाचणी कबड्डी स्पर्धा न घेता मैदानी निवड चाचणी घेण्यात आली. त्यामुळे या वेळी गटवारी जाहीर करताना 29व्या किशोर-किशोरी गटाच्या निवड चाचणी स्पर्धेत जे संघ विजेते ठरले त्याप्रमाणे त्यांना नामांकन देण्यात आले. त्यानुसार स्पर्धा कार्यक्रम आखण्यात आला आहे. स्पर्धेकरिता सहा क्रीडांगणे तयार करण्यात आली असून, सामने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रांत खेळविण्यात येतील. प्रेक्षकांकरिता पाच ते सहा हजार क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली आहे.
किशोर गट (मुले)
अ गट : कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, हिंगोली.
ब गट : परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, बीड.
क गट : मुंबई शहर, नाशिक, पालघर, अहमदनगर.
ड गट : ठाणे, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद.
इ गट : सोलापूर, मुंबई उपनगर, जालना, जळगाव.
फ गट : पुणे, रायगड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड.
किशोरी गट (मुली)
अ गट : मुंबई उपनगर, उस्मानाबाद, सातारा, नांदेड.
ब गट : कोल्हापूर, रत्नागिरी, जालना, धुळे.
क गट : मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव.
ड गट : पुणे, सोलापूर, लातूर, हिंगोली.
इ गट : सांगली, परभणी, बीड, औरंगाबाद.
फ गट : नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे.