बंगळुरू : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन पूर्ण करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) कंबर कसली आहे. या मिशन अंतर्गत 2022मध्ये भारतीय अवकाशवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. भारताची ही पहिलीच मानवी अवकाश मोहीम असल्यामुळे त्यात धोकेसुद्धा तितकेच आहेत. त्यामुळे इस्रो कुठलीही जोखीम पत्करणार नाही. मानवी अवकाशवीरांना पाठवण्याआधी इस्रोकडून मानवी रोबोट अवकाशात पाठवण्यात येणार आहे.
मिशन गगनयानमध्ये महिला अंतराळवीराचा समावेश नसला तरी महिला रोबोट मात्र अवकाशात जाणार आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मिशन गगनयानची घोषणा केली होती. ‘व्योममित्रा’ असे या महिला रोबोटचे नाव असून, ती माणसाप्रमाणे अवकाशात वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सक्षम आहे. इस्रोने बुधवारी
(दि. 22) या रोबोची पहिली झलक संपूर्ण जगासमोर आणली.
व्योममित्र संवाद साधू शकतो आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. इस्रोने हा रोबो विकसित केला आहे. या व्योममित्राने लोकांना अभिवादन करीत म्हटले, ’हाय, मी हाफ ह्युमनॉइडचा पहिला प्रोटोटाइप आहे.’ याला हाफ ह्युमनॉइड यासाठी म्हटले जात आहे की या रोबोला पाय नाहीत, पण तो पूर्ण क्षमतेने काम करेल.
अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षण
इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, अंतराळ यात्रेसाठी एकूण 12पैकी पहिले चार उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यांचे रशियातील प्रशिक्षण या महिन्याच्या शेवटी सुरू होईल. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात
येत आहे.
व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करून अहवाल पाठवणार आहे. याकडे आम्ही एक परीक्षण म्हणून पाहणार आहोत. -सॅम दयाल, ‘इस्रो’चे वैज्ञानिक