Breaking News

धमक्यांचे राजकारण

शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीकडे पाहता पोकळ धमक्यांना ते भीक घालणार नाहीत हे उघड दिसते. तथापि, राज्य सरकारने मात्र धमकीचा हा प्रकार गांभीर्याने घेतला असून शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धमकी पोकळ असो किंवा कशीही त्याची दखल घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्यच आहे.

गेल्या वर्षभरामध्ये राजकारणाचा स्तर किती खाली उतरला आहे हे आपण सारे पाहतो आहोत. साडेतीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार ज्या प्रकारे सत्तेवर आले, त्यामध्येच सध्याच्या राजकीय वातावरणाची पाळेमुळे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले असते आणि जनमताच्या कौलाचा सन्मान ठेवला असता तर महाराष्ट्रातील राजकीय हवामान इतके बिघडले नसते. विश्वासघातामधून मिळवलेली सत्ता विषारीच असते. तेच विष सध्या आपण सारे सहन करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्रातील एक जुने-जाणते राजकीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातच पवारांकडे आदराने पाहिले जाते. त्यांच्या राजकारणाबद्दल टोकाचे मतभेद असतीलही, परंतु त्याला व्यक्तिगत स्वरुप येणार नाही याची दक्षता खुद्द पवार आणि त्यांचे कुटुंबीय नेहमीच घेत असतात. राजकारणाचा स्तर खालावू न देण्याची प्राथमिक जबाबदारी राजकीय नेत्यांवरच असते. समाजमाध्यमांमुळे अश्लाघ्य टीकेचे प्रकार वाढीस लागतात आणि सलोख्याची भावना नष्ट होते असा आरोप नेहमीच केला जातो, परंतु समाजमाध्यमांवर वेडेवाकडे काही पसरू नये याची काळजी नेत्यांनीच घ्यायला हवी यात शंका नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे कायम एकमेकांविरोधात राजकीय संघर्ष करत आलेले पक्ष आहेत. दोन्ही पक्षांची विचारसरणी दोन टोकांची आहे. त्यामुळे संघर्ष हा होणारच. तथापि, यामध्ये वैयक्तिक कटुता येऊ नये यासाठी उभय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मागे एकदा शरद पवार यांचे बोट धरूनच राजकारणातील वाटचाल सुरू केली असे गौरवोद्गार काढले होते. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्षमतेबद्दल पवार यांनीही अनेकदा कौतुकोद्गार काढले आहेत. दोघांमधील वैयक्तिक संबंध मधुर असले तरी तळागाळातील कार्यकर्त्यांना त्याचे स्वरुप लक्षात येत नाही. म्हणूनच धमक्यांसारखे प्रकार घडतात. तुमचा लवकरच दाभोळकर होईल, अशी धमकी कुण्या एका कथित भाजप समर्थकाने ट्विटरवरून पवार यांना दिली. त्यामुळे राजकीय वातावरण विनाकारण तापले. अशा प्रकारची धमकी देणे गैरच. या कृतीचा निषेध करावा तितका थोडाच आहे. राजकीय जीवनामध्ये धमक्यांचे प्रसंग पुढार्‍यांना नवे नसतात. कोणाचे ना कोणाचे तरी नकळत मन दुखावले जाते किंवा नुकसान होते. अशा असंतुष्टांना खरे तर पक्ष किंवा अन्य कुठल्याही गोष्टीची कसलीही पर्वा नसते. त्यांचे वर्तन पक्षाच्या कार्यसंस्कृतीशी मिळतेजुळते असेलच असेही नाही. शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देणारा इसम भाजयुमोचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने गेले वर्षभर सत्तेवाचून तडफडणार्‍या काही पक्षांच्या नेत्यांचा आणि त्यांच्या प्रवक्त्यांचा शिवराळपणा सहन केला. व्यक्तिगत चिखलफेकीचे टोकाचे प्रयोग जनतेला बघायला मिळाले. आता महाराष्ट्राचे राजकारण धमक्यांपर्यंत येऊन ठेपले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply