पेण : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत पेण येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना विभागाच्या वतीने शहरात महिलांची भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत महिलांनी बॅनर हातात घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देत महिलांच्या सक्षमीकरणाविषयी जनजागृती केली.या रॅलीची सुरूवात पेण नगर परिषद कार्यालयापासून करण्यात आली. या रॅलीमध्ये राणी लक्ष्मीबाई, आर्मी पोलीस, वकील, डॉक्टर आदि क्षेत्रातील महिलांच्या वेशभुषा करण्यात आल्या होत्या. प्रांतधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरूणा जाधव, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे, पंचायत समिती सभापती सरिता म्हात्रे, गटविकास अधिकारी सी. पी. पाटील, शिक्षणाधिकारी अविनाश घरत, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी रश्मी झेमसे, पर्यवेक्षिका आर. आर. केणी, शोभा चव्हाण, संगिता पाटील, दिप्ती मोकल, हर्षदा दोरे, ज्योती सुरवसे आदिंसह पेण तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.