पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा वाकडी-दुंदरे रस्ता खड्यात गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात आली नाही; तर परिसरातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वाकडी, चिंचवली, रिटघर, दुंदरे या गावांना जोडणारा हा तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता असून, मोठ्या संख्येने लोक येथे वास्तव्यास आहेत. येथील रस्त्यावर खड्ड्यांची संख्या जास्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यामुळे नागरिकांची वाहने नादुरुस्त होतात; तर नागरिकांना मणक्याचा आजार जडू लागला आहे. काही वर्षांपूर्वी हा चिंचवली-दुंदरे रस्ता बनविण्यात आला होता, मात्र या रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडलेले असल्याने वाहन चालविताना ते कुठून चालवायचे, असा प्रश्न पडत आहे.
जिल्हा परिषद खड्डे बुडवण्याबाबत दिरंगाई करीत असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाहनधारकांसह पादचार्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप वाहनधारक व नागरिकांमधून केला जात आहे. दिवसेंदिवस विकसित होत असलेल्या गावातील या रस्त्यावरून प्रवास करणे सध्या कसरतीचे ठरत आहे. शालेय विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कामगार व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यापूर्वी येथील रस्त्याचे खड्डे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने बुजविण्यात आले होते. जिल्हा परिषदेने जर लवकरात लवकर हे खड्डे बुजविले नाही; तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. -रमेश पाटील, उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत