रोहित, विराटच्या पंगतीत स्थान मिळण्याची संधी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशच्या संघाला दणका दिला. भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात बाजी मारली. टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. आता भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. 6 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
वेस्ट इंडिजविरूद्ध होणार्या टी-20 मालिकेत भारताचा फलंदाज लोकेश राहुलला एक पराक्रम खुणावतो आहे. राहुलने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 974 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेट कारकिर्दीत हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 26 धावांची आवश्यकता आहे. या पराक्रमासह राहुलला रोहित, विराट आणि धोनीच्या पंगतीत स्थान मिळवण्याची संधी आहे. राहुलने जर हजार धावांचा टप्पा गाठला, तर तो हा पराक्रम करणारा सातवा भारतीय फलंदाज ठरेल.
भारताकडून आतापर्यंत टी-20 क्रिकेट कारकिर्दीत रोहित शर्मा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी हजार धावांचा टप्पा गाठला. या यादीत रोहित 2539 धावांसह अव्वल आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्येही रोहित शर्मा अव्वल आहे.