कर्जत : बातमीदार
तालुक्यातील कशेळे येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा आहे. अनेक महिने पाठपुरावा करूनदेखील जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून त्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रविवार (दि. 26) पासून कशेळे ग्रामीण रुग्णालयात आमरण उपोषण सुरू केले आहे.
कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षे अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या समस्या सुटाव्यात यासाठी कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना गेली अनेक महिने पाठपुरावा करीत आहे. या रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ 24 तास उपलब्ध असावा, डॉक्टराची रिक्त पदे तात्काळ भरणे, एक्सरे मशीन उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, मराठी आणि सर्व भाषिक बोलणारे डॉक्टर नेमावेत, तसेच कर्जत-मुरबाड या मुख्य रस्त्यापासून दवाखान्यापर्यंतचा रस्ता तात्काळ व्हावा, कशेळे रुग्णालयात रुग्णांना भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दवाखान्या शेजारी कॅन्टीग असावी या प्रमुख मागण्या पुढे करून कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे माजी अध्यक्ष जैतु पारधी आणि आदिवासी संघटनेचे विभागीय सचिव परशुराम थोराड यांनी 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. कर्जत पं. स. सदस्या जयवंती हिंदोळा, कर्जत तालुका आदिवासी संघटना अध्यक्ष भरत शिद, सचिव मोतीराम पादीर, सचिव लक्ष्मण उघडे, दत्तात्रेय हिंदोळा यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला. मात्र मागण्या मान्य होत नाहीत, तोवर उपोषण स्थगित करणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.