पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू असताना गृहखात्यात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद धोक्यात आले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धक्कादायक खुलासे आणि गंभीर आरोप केले आहेत. या आठ पानी पत्रामुळे केवळ गृहमंत्री अनिल देशमुखच नव्हे; तर संपूर्ण महाविकास आघाडी सरकारची पोलखोल झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे चित्र आहे. ज्यांच्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आबाधित राखण्याची जबाबदारी असते त्याच गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याची लक्तरे मुंबईच्या वेशीवर टांगून कारभार कसा करू नये याचे उदाहरण दिले आहे. सध्या राज्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण गाजत आहे. यामध्ये सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकार्याचा संदिग्ध समावेश चर्चेचा विषय बनला आहे. याच वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटी रुपयांची खंडणी जमा करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर हे पैसे कसे जमा करायचे याचीही आयडिया गृहमंत्री महाशयांनी दिल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे. मुंबईत एक हजार 750 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यातील प्रत्येकाकडून दोन-तीन लाख रुपये गोळा केले तरीदेखील एका महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज गोळा होतील, असे देशमुख यांनी वाझेंना स्पष्टपणे सांगितल्याचे सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. याच पत्रात सिंह यांनी म्हटलेय की, मार्च महिन्यात मी वर्षा बंगल्यावर आपल्याला भेटण्यासाठी आलो. तेथे मी अँटिलिया स्फोटके प्रकरणावर आपल्याला पूर्ण माहिती दिली. त्या वेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत तुमच्या कानावर घातले. इतकेच नाही तर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील देशमुख यांच्या चुकीच्या कामांची माहिती दिली, मात्र तेथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना तर ही माहिती आधीपासूनच होती हे माझ्या लक्षात आले. या पत्रात त्यांनी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात देशमुखांनी दबाव टाकल्याचाही उल्लेख केला आहे. डेलकर यांच्या मृतदेहासह सुसाइड नोटही मिळाली होती. या नोटमध्ये काही वरिष्ठ अधिकार्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे डेलकर यांनी म्हटले आहे, परंतु देशमुख सातत्याने आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांवर दबाव टाकत होते, असे सिंह यांनी म्हटलेय. एकंदर हे प्रकरण देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीवर चांगलेच शेकणार असे दिसत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. इतर पक्षांचे नेतेही सरकारविरोधात सरसावले आहेत. आता ठाकरे सरकार यावर काय भूमिका घेते याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …