Breaking News

‘मी खोटी आश्वासने देत नाही’

नागपूर ः प्रतिनिधी

मी खोटी आश्वासने देत नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसारखी मूल्येच मोठ्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे माध्यम असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारण हे एक प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे. जिथे लोकांच्या आकांक्षेनुसार काम करावे लागते, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी राजकारणाला कधीही आपले ‘करिअर’ म्हणून निवडले नाही. मी सुरुवातीच्या दिवसांपासून राजकारणाला सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे माध्यम समजत आलो आहे. या माध्यमातून देश, समाज आणि गरिबांसाठी काही करता येऊ शकते असा मला विश्वास आहे. राजकारणासाठी कोणत्याही गुणांची गरज नाही. प्रत्येकाने राजकारण फक्त प्रामाणिकपणे केले पाहिजे. मी कधी खोटी आश्वासने देत नाही. मी जेव्हा एखादे काम करेन असे सांगतो, तेव्हा मी ते काम करतोच आणि जर काम होणार नसेल तर मी तसे स्पष्टपणे सांगतो. प्रामाणिकपणा, पारदर्शकता, धैर्य आणि कामाप्रति प्रतिबद्धतेसारखी मूल्येच दीर्घ वाटचालीसाठी कामाला येतात. मी कधीच कुठले लक्ष्य निश्चित केले नाही. जिथे रस्ता मिळेल तिथे मी गेलो. जे काम दिसेल ते मी करीत गेलो. देशासाठी सर्वोत्कृष्ट काम करण्यावर मी विश्वास ठेवतो, असे म्हणत त्यांनी आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याचे या वेळी स्पष्ट केले. माझ्या डोक्यात असे काहीही नाही आणि संघाचीही अशी कोणती इच्छा नाही. आमच्यासाठी देशच सर्वांत वर आहे, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply