Breaking News

नवी मुंबईत श्वसनविकारांत वाढ

हवेचे सर्वाधिक प्रदूषण; औद्योगिक वसाहतीतून सोडले जातेय रसायन

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईत सर्वाधिक हवेचे प्रदूषण होत असल्याचे समोर आल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. प्रदूषित झालेल्या हवेमुळे नागरिकांनाही त्रास जाणवू लागला आहे. औद्योगिक वसाहतीमधून सोडल्या जाणार्‍या रसायनयुक्त, दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असून पहिल्यांदा हे प्रकार थांबवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. शहरातील औद्योगिक वसाहतींमधील धूर हवेत सोडला जात असला तरी सध्या थंडीच्या दिवसात प्रदूषके हवेच्या खालच्या थरात साचून राहतात. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढते. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीलगत असणार्‍या नागरिकांना सध्या रसायनमिश्रित हवेतून श्वास घ्यावा लागत आहे. याच औद्योगिक वसाहतींमधून निघणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले जाणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, कारण औद्योगिक वसाहतीमधून सांडपाणी घेऊन येणार्‍या या नाल्यांमध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळते. यामुळे या नाल्यातील पाण्याचा रंग दररोज बदलत असतो. सध्या नाल्याच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांना सकाळ-संध्याकाळ रसायनांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेकांना श्वास घेण्यासही अडथळे येत आहेत. तर, काहींना मळमळल्यासारखेही होत आहे. पालिका हद्दीत घणसोली, जुईनगर, पावणे येथील नाल्यामधून मोठ्या प्रमाणात हे प्रकार पाहायला मिळत आहेत. याबाबत अनेकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे. मात्र हा त्रास कमी झालेला नाही. आत्ता तर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नवी मुंबईचे नाव पुढे आले आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील वाढत्या धूलिकणांमुळे व वाहनांच्या प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वसनविकारांची लागण झाल्याचे दिसू लागले आहे. पूर्वीपासून दमा, अस्थमा, न्यूमोनिया, ब्राँकायटिस व घशाचे आजार असलेले रुग्ण, गर्भवती माता, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास जाणवू लागला आहे. गेल्या दहा दिवसांत श्वसनविकारांचे प्रमाण हे 20 ते 30 टक्क्यांनी वाढले असल्याचे तेरणा स्पेशालिटी रुग्णालयाचे फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ. अभय उप्पे यांनी सांगितले आहे. या रसायनमिश्रित दुर्गंधीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला असल्याची तक्रार घणसोलीमधील रहिवासी अशोक मोकल यांनी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply