Breaking News

पिंपळपाडा येथील अंगणवाडी धोकादायक; विद्यार्थी घेताहेत अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण

कडाव : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै 2019पासून विद्यार्थी अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त

करीत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून  मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा येथे सन 2016-17मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम  करण्यात आले, मात्र या कामाचा दर्जा चांगला नसल्याने काही दिवसांतच अंगणवाडी इमारतीच्या भिंतींना अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत, तर जोत्याचे बांधकाम खचले आहे. इमारतीमधील लादी समतल असल्याचे दिसत नाही. इमारतीवर पत्रा बसविण्यासाठी लावण्यात आलेले लोखंडी पाइप काही ठिकाणी अर्धवट तुकडे स्वरूपात बसविले आहेत. इमारत धोकादायक वाटत असल्याने  ग्रामस्थांनी अंगणवाडी इतरत्र भरविण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून अंगणवाडीसेविकेच्या घरी मुलांना शिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, पिंपळपाडा येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक झाली असून, त्याकडे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर या अंगणवाडी इमारतीचे काम नव्याने करण्यात यावे, अशी मागणी तुकाराम बांगारे, तुळशीराम बांगारे, हनुमंत केवारी, सखाराम बांगारे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

पिंपळपाडा येथे बांधलेली अंगणवाडीची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन अंगणवाडी बांधकामाची पाहणी करून आवश्यकता असल्यास लवकरच अंगणवाडी सुस्थितीत केली जाईल.

– सुरेखा हरपुडे, सदस्य, पंचायत समिती कर्जत

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply