पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे विद्यालयात विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. विद्यालयात पालकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी विद्यालयाच्या मदतीने महिला पालक मेळाव्याचे आयोजन शुकवारी (दि. 31) केले होते. यामध्ये प्रायमा मेडिकल संस्थेच्या सदस्या डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांच्या सहकार्याने उपस्थित महिलांचे होमोग्लोबीन चेकअप शिबिराचे आयोजन केले होते, तसेच डॉ. महिंद्रकर यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना आरोग्य व आपली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. विद्यालयाकडून महिलांना हळद-कुंकू देऊन विद्यालयाने महिलांसाठी दोन खेळ आयोजित केले होते. यामध्ये संगीत खुर्ची या खेळात पहिल्या तीन क्रमांक विजेत्या सीमा ठाकूर, लता वाडकर, सुनिता गायकर तसेच बकेट बॉल या खेळात पहिल्या तीन क्रमांक विजेत्या सुचिता केणे, माधुरी केणे, सुनिता पाटील या महिला पालकांना बक्षिस देऊन गौरवण्यात आले. वाशी स्कूलचे समन्वयक महाजन, गुळसुंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुतार, स्कूल कमिटी सदस्य अनिल पाटील, मनोज पवार व होमोग्लोबीन चेकअपसाठी विवेक पवार, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विविध गावातून 125 महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याच्या नियोजनासाठी विद्यालयातील महिला शिक्षिका व्ही. यु. म्हात्रे, एस. व्ही. म्हात्रे, एस.टी. चंदने, जे. एच. पाटील, पी. एच. रोकडे, के. एफ. मुल्ला यांनी सहकार्य केले. मेळावा यशस्वी केल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आर. डी. पाटील व उपाध्यक्ष भाई गुडेकर यांनी सर्व पालकांचे व विद्यालयाच्या स्टाफचे कौतुक केले.