मुंबई ः प्रतिनिधी
झोपलेल्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. सीएएच्या मुद्द्यावरुन जी भूमिका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. सीएए काय आहे हे काही लोकांना समजूनच घ्यायचे नाही. हा कोणाचीही नागरिकता हिसकावून घेणारा कायदा नाही. कुठेही कोणाला जेलमध्ये धाडले जाणार नाही. हे सगळ्या पक्षांना ठाऊक आहे. तरीही सीएएला विरोध दर्शवला जातो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सीएए कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर देणारा कायदा आहे, मात्र यावरून सध्या देशात जाणीवपूर्वक विरोधी वातावरण तयार केले जात आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला. विरोधक अराजकता पसरवत आहेत. फक्त मुसलमान बांधवच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते तर बंजारा समाजाच्या बांधवांनाही तुमचे नागरिकत्व धोक्यात आहे म्हणून घाबरवत आहेत, अशीही टीका फडणवीस यांनी केली.
मुंबईत काही लोक एकत्र येऊन शरजील तेरे सपनोंको हम पुरा करेंगे, असे म्हणतात. हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसा खपवून घेतात? आसामला तोडण्याचे स्वप्न मुंबईत पूर्ण करायचे असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मला काही अपेक्षाच नाहीत. कारण ते मतांच्या राजकारणासाठी असेच करतात, मात्र यापूर्वी असे काही झाल्यावर चवताळून उठणारी शिवसेना आज शांत का, हा प्रश्नच आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …