उरण : वार्ताहर : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विशेष श्रम संस्कार शिबिर वेश्वी येथे झाले.
शिबिरात वेश्वी व दादरपाडा या दोन गावात स्वछता करून स्वच्छतेतून समृद्धीकडे चा संदेश दिला वेश्वी कातकरवाडी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधार्यासाठी खड्डा खणून सुमारे 325 वाळूच्या गोणी भरून बांध बांधण्यात आला. तसेच वाळूच्या गोणींच्या मागे तेवढ्याच उंचीचा दगडांचा बंधारा बांधला. आदिवासीवाडीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे माती टाकून भरले.
या वेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना टीटेनस व दिफ्थेरियाचे मोफत लसीकरण करण्यात आले. वेश्वी गावात एड्स जनजागृती, बेटी बचाव, पर्यावरण संरक्षण, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, विजेची बचत, पाणी अडवा पाणी जिरवा ह्या विषयांवर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत जनजागृती रॅली काढण्यात आली. यास मुख्याध्यापिका केणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराचा समारोप सुधीर घरत, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील ह्यांच्या उपस्थितीत झाला. शिबिरास प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वेश्वी, पी. पी. मुंबईकर विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर, सरपंच नरेंद्र मुंबईकर, माजी सरपंच अजित पाटील, संदीप पाटील, सुनील तांबोळी, मुख्याध्यापक प्रीतम टकले व सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. गोरख सांगळे ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिबिराचे नियोजन एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. आमोद ठक्कर, प्रकल्प अधिकारी डॉ. झेलम झेंडे, एसटी प्रकल्प अधिकारी पंढरिनाथ घरत यांनी केले.