पनवेल : बातमीदार
पाणीपुरवठा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात मोठ्या प्रमाणात तूट निर्माण होऊ लागल्याने सिडकोने खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल आणि कामोठे या नवी मुंबईच्या दक्षिण भागातील पिण्याच्या पाण्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अल्प उत्पन्न गटातील निवासी भागांत 20 हजार लिटरपर्यंतच्या पाण्यासाठीची वाढ सव्वा रुपये राहणार आहे, तर उच्च वर्गासाठी ही दरवाढ 25 रुपयांपर्यंत असणार आहे. यामुळे सिडकोची 121 कोटी रुपयांची तूट भरून निघणार आहे.
दक्षिण नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल आणि कामोठे हे नोड सिडकोने पनवेल पालिकेला काही प्रमाणात हस्तांतरित केले असले तरी पाणीपुरवठासारखी सेवा पालिकेने स्वत:कडे ताब्यात घेतलेली नाही. त्यात या शहरी भागाला पाणीपुरवठा करण्याची सेवा महत्त्वाची आहे. सिडकोच्या या दक्षिण नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडको जलसंपदा विभागाच्या हेटवणे, नवी मुंबई पालिकेच्या मोरबे आणि तळोजा एमआयडीसीतून
पाणी विकत घेत आहे.
तफावत वाढीमुळे निर्णय
गेली अनेक वर्षे पाणी दरवाढ केलेली नाही, मात्र पाणीपुरवठा आणि त्यातून पाणी देयकातून येणारी रक्कम यात तफावत वाढू लागल्याने सिडकोने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यावर संचालक मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ही दरवाढ लागू केली जाणार आहे. अल्प उत्पन्न, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाच्या वसाहती विकसित केलेल्या आहेत.