Breaking News

पेण ग्रामीण रुग्णालय ‘अत्यवस्थ’

विविध समस्यांमुळे रुग्णांनी फिरवली पाठ

पेण : प्रतिनिधी

जेथे रुग्णांनी उपचार घ्यायचे ते पेण येथील ग्रामीण रुग्णालयच विविध समस्यांमुळे आजारी पडले आहे. त्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे सोडून खासगी ठिकाणी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या शासकीय ग्रामीण तथा उपजिल्हा रुग्णालयात बर्‍याच वेळा फक्त रिकाम्या खाटा रुग्णांची वाट बघत असल्याचे चित्र पहावयास मिळते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची एकूण आठ महत्त्वाची पदे कार्यरत असल्याची नोंद जरी असली, तरी दोनच डॉक्टर कायमस्वरुपी या रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. उर्वरित सहा वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरली गेली नसल्याने या सहा जागा कायम रिक्त आहेत, तर आणखी तीन डॉक्टरांची व्यवस्था जरी करण्यात असली तरी हे डॉक्टर कायमस्वरूपी नसून ते मानधनावर काम करीत आहेत. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून रक्त संकलन मशीन आणण्यात आलेली आहे, मात्र ही मशीन हातळण्यासाठी तज्ञ व्यक्ती नसल्याने ती गेले अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहे. दातांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तीही मशीन तशीच पडून आहे. वैद्यकीय शाखेतील कोणत्याही प्रकारचा सर्जन पदावरील डॉक्टर या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने आलेल्या कोणत्याही रुग्णाची सर्जरी केली जात नाही. परिणामी रुग्णाला इतर ठिकाणच्या रुग्णालयात हलवावे लागते. याचा शारिरीक व मानसिक त्रास रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना होतो. रुग्णालयात प्रसुतीसाठी व महिला रुग्णांच्या तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने एखाद्या महिलेवर उपचार व शस्त्रक्रिया करायची झाल्यास अलिबागहून स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना पाचारण करावे लागते. एवढेच नव्हे तर या रूग्णालयातील अ‍ॅडमिट करण्यात आलेल्या रुग्णाला विशेेषकरून गरोदर महिलेला सकाळच्या वेळी अंघोळीला देण्यात येणार्‍या पाण्यासाठी बसविलेले सोलर मशीनदेखील बंद असल्याने त्यांना गरम पाण्याऐवजी थंड पाण्यातच आंघोळ करावी लागते. डॉक्टरांच्या हजेरी नोंदणीसाठी लावण्यात आलेली बायोमेट्रीक मशीन मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद असल्याने शासनाने ही मशीन प्रत्येक कार्यालयात लावणे बंधनकारक असल्याचे काढलेल्या शासकीय आदेशाला या रुग्णालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीनदेखील उपलब्ध नसल्याने या रुग्णांची गैरसोय होते. पेण उपजिल्हा रुग्णालयात असणार्‍या या समस्यांचा डोंगर पाहून आणि येथील गैरसोयींचा अनुभव अनेक रुग्णांना आल्याने पेणमधील जवळपास 70 टक्के रूग्ण हे खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडतात, पण त्यांना जादा दाम भरावे लागत. शासनाने रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडू नये, यासाठी पेण रुग्णालयातील रिक्त पदे भरून सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply