Breaking News

दुकानाच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

व.पो.नि. अजयकुमार लांडगे यांचे ज्वेलर्सच्या व्यापार्‍यांना आवाहन

पनवेल : वार्ताहर

आपल्या दुकानात विक्रीसाठी असलेला सोने- चांदीचा माल हा महत्वाचा असून दुकान बंद झाल्यावर त्या मालाच्या सुरक्षिततेकडे व्यापारी बंधूंनी अधिक लक्ष द्यावे व जास्तीत जास्त सुरक्षित उपकरणांचा वापर करावा व चोरीचे प्रकार थांबवावेत, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी पनवेल परिसरातील सोने-चांदीचे व्यापारी, संघटनेचे पदाधिकारी यांची सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून घेतलेल्या बैठकीत आवाहन केले. या बैठकीला पनवेल ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतनलाल मेहता यांच्यासह सुमारे 24 व्यापारी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले की, ज्वेलर्स आस्थापनेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम सुरक्षा रक्षक दिवसा व रात्री असे वेगळे नेमावेत, नेमण्यात आलेला सुरक्षा रक्षक याची योग्य ती माहिती तसेच तो प्रशिक्षित असावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. या व्यक्तीचा फोटो, त्याची माहिती याची यादी तयार करून त्याचा रेकॉर्ड करावा, त्याचप्रमाणे चांगल्या प्रतीचे नाईट व्हीजन सीसीटीव्ही कॅमेरे, दुकानासमोरील सुमारे 500 मीटर रस्ता कव्हर होईल अशा स्थितीत बसवावेत, त्याचे रेकॉर्डींग 24 तास चालू ठेवावे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती मिळण्याकरिता व संपर्कासाठी आलार्म सेवा सुरळीत चालू ठेवावी. त्याचबरोबर पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष आदी महत्वाचे फोन नंबर दर्शनी भागावर सर्वांना नजरेस पडतील असे लावावेत, त्याचप्रमाणे दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ गार्डची नेमणूक करून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आत प्रवेश देण्याबाबत व त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगावे. एखाद्या व्यक्तीची हालचाल संशयितरित्या आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. लॉकर सिस्टीम मजबूत व चांगल्या प्रतीची असावी, दुकानात असणार्‍या कामगारांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना कामावर ठेवावे, मालाची खरेदी करताना बिलाची पडताळणी करूनच व्यवहार करावा तसेच अनोळखी व्यक्तीकडून किंवा चोरीचे सोने खरेदी करू नये. दुकानाबाहेर उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांची दररोज नोंद घेऊन एक रजिस्टर अद्ययावत करावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या. त्याचबरोबर व्यापारी वर्गांना येत असणार्‍या अडीअडचणी संदर्भात उपस्थितांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply