Breaking News

‘ते’ मंगळसूत्र सापडले घरातच

पनवेल : बातमीदार

तालुक्यातील दुंदरे गावात राहणार्‍या शारदा माळी (55) या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील मंगळसूत्र त्यांच्याच घरात सापडले आहे. तपासादरम्यान एका खिडकीजवळ सिलिंडरच्या मागे पडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागले. हे प्रकरण ज्या मंगळसूत्राच्या चोरीमुळे घडले ते मंगळसूत्र घरातच कसे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

दुंदरे गावातील शारदा माळी यांनी नव्याने खरेदी केलेले मंगळसूत्र त्या शेजारी राहणार्‍या नातेवाइकांना दाखविण्यासाठी 3 फेब्रुवारी रोजी गेल्या होत्या. एका अल्पवयीन मुलीने मंगळसूत्र चोरी केल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे शेजारीच राहणार्‍या पाटील कुटुंबासोबत त्यांचा टोकाचा वाद झाला. त्यानंतरही पाटील कुटुंबाने शारदा यांना शिवीगाळ करणे सुरूच ठेवले. त्यामुळे हा वाद आणखी विकोपाला गेला होता.

पोलिसांनी अटक केलेले अलका गोपाळ पाटील (45), तिचे पती गोपाळ विठ्ठल पाटील, वनाबाई अर्जुन दवणे (60) आणि हनुमान भगवान पाटील हे चौघे शारदा यांचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर फरार झाले होते. या चौघांनी शारदा माळी यांना भांडणात मारण्याची धमकी दिली होती, तसेच शारदा यांनी गळफास घेतला नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांचे पती आणि मुलांनी केला आहे. शारदा यांच्या मृतदेहावर भाजल्याच्या खुणा होत्या. त्यांचे केसही जळालेले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हत्या व पुरावा नष्ट करणे या कलमांची वाढ केली आहे.

या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल अद्याप आला नाही. या प्रकरणाला कारणीभूत ठरलेले मंगळसूत्र शारदा यांच्याच घरात सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आता हे मंगळसूत्र खिडकीतून कोणी आत टाकले की घरातच होते हे मात्र तपासानंतरच स्पष्ट होईल.

-अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply