पनवेल : बातमीदार : मुंबईतील धारावी भागात राहणार्या एक विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या सहाय्याने खारघरमधील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्याने त्याच प्रमाणपत्रांचा वापर करून पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्तीसुद्धा घेतल्याचे आढळून आले आहे. खारघर पोलिसांनी या विद्यार्थ्याविरोधात फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या घटनेतील विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष 2016-17 या वर्षासाठी खारघर येथील डॉ. जी. डी. फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातून बीएएमएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्याने कॉलेजमध्ये आदिवासी असल्याबाबतचा जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले. मात्र ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने ऑक्टोबर 2018मध्ये या विद्यार्थ्याच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश वायएमटी
आयुर्वेदिक कॉलेजला दिले होते. त्यामुळे वायएमटी कॉलेजने या विद्यार्थ्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र पडतळणीसाठी नंदूरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे पाठविले होते.
समितीने या विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून ते बनावट असल्याचा अहवाल वायएमटी आयुर्वेटिक कॉलेजला पाठवून दिला. त्यावरून या विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दोन वर्षे शिक्षण घेतल्याचे आढळून आले. तसेच या विद्यार्थ्याने त्याच बनवाट प्रमाणत्रांच्या सहाय्याने पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्ती घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यामुळे वायएमटी कॉलेजने या तरुणाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्याविरोधात फसवणूक व बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा
शोध सुरू केला आहे.