खोपोली : प्रतिनिधी
एकीकडे स्वच्छता अभियान अंतर्गत दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षणसाठी खोपोली नगरपालिकेचा करोडो रुपयांचा निधी खर्च होत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे शहरातील विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसते. खोपोलीतील अनेक प्रभागात सार्वजनिक स्वच्छता अबाधित राखण्यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधित विभागातील अधिकारी प्रचंड उदासीन असल्याचा आरोप माजी नगरसेवकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपालिका हद्दीतील शीळफाटा येथील अनेक रहिवासी भागांत स्वच्छता कर्मचारी व नगरपालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याविरोधात आक्रमक होत स्थानिक रहिवासी बुधवारी रस्त्यावर उतरले व त्यांनी नगरपालिकेचा निषेध केला. अशीच स्थिती शहरातील अन्य रहिवासी भागांची असल्याने नगरपालिकेचा स्वच्छता विभाग व संबंधित अधिकार्यांविरोधात नागरिकांत मोठ्या प्रमाणावर रोष वाढत आहे. साजगांव यात्रा संपून दोन आठवडे उलटले तरीही तेथील कचरा तसाच पडून होता. शहरातील गटारे सदासर्वकाळ तुंबलेली असतात. कचराकुंड्या वेळेवर खाली होत नसल्याने कुत्री, डुकरे व मोकाट प्राणी कुंड्यातील कचरा रस्त्यांवर आणतात व रस्त्यांवर कचराच कचरा होत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला मार्केट परिसर, बाजारातील सार्वजनिक शौचालय व मुतारीची अवस्था तर अतिबिकट आहे. रस्ते सफाई, सार्वजनिक चौक व उद्यान सफाईबाबत नगरपालिका प्रशासन पूर्ण उदासीन असल्याने त्याही ठिकाणची अवस्था तशीच बिकट बनल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत खोपोली नगरपालिकेतील संबंधित विभाग प्रमुख किंवा अन्य वरिष्ठ अधिकार्यांना विचारले असता, सर्व सुरळीत सुरू असल्याच्या अविर्भाव त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.