आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा
वर्धा : प्रतिनिधी
हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला कलम 307, 326 (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये हत्येच्या कलमाची वाढ करण्यात आली आहे.
हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलदगतीने चालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणने काम करावे. अशा घटनेच्या तपासात कुचाराई होऊ दिली जाता कामा नये. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाच्या संबंधित विभागांनीही समन्वयाने
काम करावे. खटला वेगाने चालून दोषीला कडक शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात यावा, असा सूर व्यक्त होत आहे.
एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच्या निर्भयाने सात दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र सोमवारी पहाटे उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. पीडितेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दारोडाच्या ग्रामस्थांचा आक्रोश अनावर झाला. आधी आरोपीला जिवंत जाळा; मग पीडितेवर अंत्यसंस्कार करा, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी सुरुवातीला महामार्ग रोखून धरला. त्यानंतर पीडितेचा मृतदेह गावात घेऊन जाणार्या शववाहिनेवर दगडफेक करण्यात आली, तसेच दारोडा गावात पोलिसांना गावकर्यांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला होता.
कॉलेजमध्ये जात असताना पीडितेवर आरोपी विकेश नागराळेने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेलादेखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करून पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला, मात्र तिची मृत्यूशी झुंज संपली. त्यामुळे आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.