Breaking News

वन डे मालिकेत भारत हरला, पण राहुल-श्रेयसने मने जिंकली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0ने जिंकल्यानंतर वन डे मालिका यजमानांनी 3-0ने जिंकत भारताच्या व्हाईटवॉशला त्याच पद्धतीने उत्तर दिले. असे असले तरी के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या जोडीने आपल्या सर्वांगसुंदर खेळीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताच्या के. एल. राहुलने शतक ठोकले. वन डे क्रिकेटमधील त्याचे चौथे शतक ठरले. या शतकासह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. सर्वांत कमी डावांमध्ये चार वन डे शतक झळकावणार्‍या भारतीय फलंदाजांत राहुलने दुसरे स्थान पटकावले. त्याने 31 डावांमध्ये हा पराक्रम केला. यात शिखर धवन (24 डाव) अव्वल स्थानी आहे. कोहलीला चार शतके झळकावण्यासाठी 36 डाव खेळावे लागले होते. यासोबतच न्यूझीलंडमध्ये शतक झळकावणारा राहुल हा पहिलाच भारतीय यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद 85 धावा या
सर्वोत्तम होत्या. त्याचप्रमाणे 21 वर्षांनंतर भारतीय यष्टिरक्षकाने आशियाई देशांबाहेर शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1999मध्ये राहुल द्रविडने श्रीलंकेविरुद्ध 155 धावा केल्या होत्या.
टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत असताना श्रेयस अय्यरची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरी ही वाखणण्याजोगी राहिलेली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या
वन डे सामन्यात श्रेयसने संयमी खेळी करीत अर्धशतक (62 धावा) केले. यासोबतच तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत असताना सर्वाधिक धावा
करणार्‍या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरने (217 धावा) पहिले स्थान पटकावले आहे. त्याने युवराज सिंग (210 धावा) आणि राहुल द्रविड (209 धावा) यांचा विक्रम मोडला. वन डे क्रिकेटमध्ये 16 डावांनंतर सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीतही अय्यरने पहिले स्थान मिळवले आहे. याशिवाय श्रेयसने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी 2014च्या न्यूझीलंड दौर्‍यावर धोनीने 50+ अशी कामगिरी केली होती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply