Breaking News

राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम!

3 जागा द्या, अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार सज्ज

पुणे ः प्रतिनिधी : आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागावाटपाची तयारी नाही. आघाडीने आम्हाला तीन जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशार्‍यामुळे आघाडीचे दाबे दणाणले असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी तीन जागा सोडाव्यात. यामध्ये बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा, तर वर्धा येथील काँग्रेस कोट्यातील जागा सोडण्यात यावी, तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही, असेही राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितले. हातकणंगले मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यावर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या बाजूने लढताना अनेक वेळा मी आंदोलने केली. शेतकरी न्याय हक्कांसाठी अनेकदा आवाज उठवला. त्यामुळे माझ्यासमोर कोणीही निवडणूक लढवली तरी माझी काहीही हरकत नाही. मी हातकणंगले मतदारसंघातून पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अनेक प्रस्ताव आले, मात्र वर्धा, बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. वर्धा मतदारसंघातून माजी मंत्री सुबोध मोहिते, तर बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही उद्यापर्यंत अल्टीमेटम देतो. आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, अन्यथा राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 15 जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. याआधीच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत सहभागी होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातील 48 जागांवर वंचित आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत कोणता निर्णय घेते हे आगामी काळात कळेल.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply