आ. रविशेठ पाटील यांचा निर्धार
नागोठणे : प्रतिनिधी
शहरासह विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात नुकतीच आढावा बैठक पार पडली. बैठकीस सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पंचायत समिती माजी उपसभापती मारुती देवरे, निवृत्त न्यायाधीश डी. पी. पाटील, डॉ. अनंत पाटील, भाजप रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, आनंद लाड, शेखर गोळे यांसह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस आ. पाटील यांनी जनतेची कामे करणे हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्य आहे, असे सांगताना पक्षभेद न करता मिळालेल्या मतांची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मतदारसंघाचा मागील 10 वर्षांचा अनुशेष भरून काढण्याचे काम करणार आहे. मतदारसंघाचा मीच मुख्यमंत्री असून माझ्या अधिकाराचा वापर करून घ्यावा, असे आवाहनही या वेळी त्यांनी केले. या बैठकीत शेतीची भरपाई अद्यापही मिळाली नाही, पोयनाड नागोठणे ते आमडशी रस्त्याची सुधारणा करावी, अलिबागचे संबंधित खाते या मार्गाकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याने अलिबागकडून काढून हा रस्ता रोहे कार्यालयाकडे वर्ग करावा, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस दर्जाचा डॉक्टर उपलब्ध करावा, नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, सध्याच्या वापरात असलेले डम्पिंग ग्राऊंड दुसरीकडे हलवावे, जुन्या ऐतिहासिक पुलाशेजारी नवीन पूल तयार करण्यात यावा, वाकण नाक्यानजीक महामार्गाचा भराव होत स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे, यांसह अनेक विषय चर्चिले गेले. चर्चेत मारुती देवरे, किशोर म्हात्रे, सोपान जांबेकर, तुकाराम राणे, जानू कोकरे, प्रकाश मोरे, डॉ. मिलिंद धात्रक यांनी भाग घेतला. या वेळी आ. पाटील यांनी उपस्थित अधिकार्यांना सूचना करताना प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे आदेश दिले.