Breaking News

रायगडकरांनी घंटानाद करून व्यक्त केली कृतज्ञता

अलिबाग : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला रायगडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. संपूर्ण जिल्ह्यात सन्नाटा होता. एरवी गजबजणारे रस्ते, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे सारे काही सुने सुने होते. एसटी बसेसच काय पण खासगी वाहनेदेखील रस्त्यांवरून धावत नव्हती. जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळपासूनच या कर्फ्यूला शहरी भागांबरोबरच खेड्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांनी सायंकाळी 5 वाजता घंटानाद करून अत्यावश्यक सेवा देणार्‍या आरोग्य, प्रशासन, पोलीस आदी यंत्रणांचे आभार मानले.

शरीरसंपदेकडे आजकाल बरेच लोक जाणीवपूर्वक लक्ष देतात. योगा, व्यायामाबरोबरच  मॉर्निंग वॉकलाही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. हे चित्र गावातही पाहायला मिळते, मात्र रविवारी मॉर्निंग वॉकला सुटी देऊन अनेकांनी घरीच राहून व्यायाम करणे पसंत केले. खेडेगावातदेखील लोकांनी घरात बसणे पसंत केले. या कर्फ्यूला रायगडकरांनी 100 टक्के प्रतिसाद दिला.

जनता कर्फ्यूचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि जलवाहतुकीवरही दिसून आला. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा, मुंबई-पुणे आणि द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) असे तीन प्रमुख मार्ग जातात. या तिन्ही मार्गांवर एखाद दुसरे वाहन दिसले. कोकण रेल्वेही ठप्प होती. गाड्या रद्द केल्याने रेल्वेस्थानकांवर शुकशुकाट होता. मुंबई भाऊचा धक्का ते रेवस आणि गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या प्रवासी जलवाहतूक सेवादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. जनतेने मनापासून या कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा थोडा ताण कमी झाला. तरीही पोलिसांची सर्वत्र करडी नजर होती. पोलीस शहरात आणि गावातही फिरत होते. एकटा दुकटा जर कोणी  फिरताना दिसला तर त्याला विचारत होते. सायंकाळी 5 वाजता कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस, प्रशासन तसेच अहोरात्र झटणार्‍या आरोग्यसेवेतील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी रायगडवासीयांनी घंटा, थाळी, टाळ्या, शंख वाजवून ऋण व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply