पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी आणि ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेली टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आसाम येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम 2020 या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विविध क्रीडा प्रकार असलेल्या खेलो इंडिया युथ गेम या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने आसाममध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील कनिष्ठ एकेरीत रौप्य, तर दुहेरी गटात तिने कांस्यपदक पटकाविले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संघाने टेबल टेनिसमध्ये एकूण नऊ पदके जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. यामध्ये स्वस्तिकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, तसेच रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांनी रविवारी (दि. 16) स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने दर्जेदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची ती इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाला फ्रान्स येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्वस्तिकाने देश-विदेशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हाँगकाँग, जॉर्डन, कोलंबो यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे. तिने लहानपणापासून टेबल टेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले. त्यामुळे तिला विराट कोहली फाऊंडेशनकडून स्कॉलरशिपही जाहीर झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे.
स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे टेबल टेनिस खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिकाची वाटचाल सुरू आहे. ओमान येथे झालेल्या ओमान ओपन स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणूनही स्वस्तिकाने यशस्वी जबाबदारी बजावली. त्या वेळी या स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने 2013 साली गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर अंडर 12 टेबल टेनिस श्रेणीतील ऑल इंडिया अव्वल रँक प्राप्त केली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे. मागील वर्षी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्णमय कामगिरी केली होती.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …