मुंबई : प्रतिनिधी
इंडियन प्रीमिअर लीग 2020चे अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर साखळी फेरीतील 56 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची चाहते वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी संघांनी त्यांच्या सामन्यांची माहिती दिली होती, परंतु अधिकृत वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर रंगणार आहे, तर 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. बीसीसीआयने फक्त साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानंतरच्या क्वालिफायर मॅचचा तपशील अद्याप दिलेला नाही दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने गुवाहाटी शहराची निवड दुसरे शहर म्हणून केली आहे. गुवाहाटीत या वर्षी दोन सामने होतील. पहिला सामना 5 एप्रिल रोजी दिल्लीविरुद्ध, तर दुसरा सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होईल.