विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन; रामदास पठार येथील सभामंडपाचे उद्घाटन


महाड : प्रतिनिधी
हिंदू रक्षक म्हणविणार्यांनाच आता हिंदुत्वाचा विसर पडत चालला आहे. मात्र आम्ही हिंदूत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) शिवसेनेला टोला लगावला.
रामदास पठार येथील श्री गावदेवी म्हसोबा मंदिरासमोर माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन सोमवारी दुपारी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. इतिहासावर भविष्याची वाटचाल अवलंबून असते, त्यामुळे कोणी इतिहास विसरू नये, मात्र तो चघळतही बसू नये. सध्या विविध अपप्रवृत्ती हिंदू धर्माला धक्का देण्याचे काम करीत आहेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला देव, देश आणि धर्म वाचविण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी आपण सर्वानी त्यांना ताकद आणि पाठिंबा दिला पाहिजे, असे आमदार दरेकर म्हणाले. देशातील 1100 समर्थमठांची सुंदरमठ (रामदास पठार) ही राजधानी आहे. हिंदुंचा स्वाभिमान जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवथरघळीचे संशोधक तपोनिधी अरविंदनाथ महाराज यांनी केले. इतिहासकार दत्ता नलावडे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. तुळशीच्या रोपाला जलार्पण करुन आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते पारायणाचा प्रारंभ करण्यात आला. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महाड तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदिप ठोंबरे, महेश शिंदे, तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह दासभक्त या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.