नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या 30 वर्षांत संसदेत पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचे सरकार आले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची बाजू गांभीर्याने ऐकली जाते. हे यश सव्वाशे कोटी जनतेचे आहे, ज्यांनी 2014 मध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आणले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कामांचा लेखाजोखा बुधवारी (दि. 13) संसदेत मांडला. पंतप्रधान मोदी यांचे लोकसभेत भाषण झाले. 16व्या लोकसभेचे हे अखेरचे सत्र आणि त्याचा आजचा अखेरचा दिवस होता. या वेळी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांचा मोदींनी आढावा घेतला. ते म्हणाले, आमच्या कार्यकाळात 219 विधेयके आली आणि त्यातली 203 पारित झाली. आधार ओळखपत्राला याच सभागृहाने खूप मोठी ताकद दिली. नोटाबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय घेतले. सामाजिक न्यायाच्या दिशेनेही या सभागृहाने पावले उचलली. आरक्षण कायदा आणला. समाजातल्या मागास वर्गासाठी कायदा आणला. देशाने गेल्या पाच वर्षांत डिजिटल जगात आपली जागा निर्माण केली. अवकाश संशोधनात जागतिक पातळीवर भारताला मोठे
यश मिळाले. भारत पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज जगात सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, असे मोदींनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या शेवटच्या भाषणातही टीकास्त्र सोडले. मोदी म्हणाले, आम्ही ऐकून होतो की भूकंप येणार, पण पाच वर्षे झाली कोणताही भूकंप आला नाही. लोकशाहीची शक्तीच इतकी मोठी आहे की तिने भूकंपही पचवला. गळाभेट घेणे आणि गळ्यात पडणे यात काय फरक असतो हे मला संसदेत पहिल्यांदाच कळले. ‘आँखो की गुस्ताखियाँ’ पाहायला मिळाल्या, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधींना चिमटा काढला.
– मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे -मुलायम
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि लोकसभेतील ज्येष्ठ सदस्य मुलायमसिंह यादव यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करताना मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा उघडपणे बोलून दाखवली. त्यावर मोदींनी सभागृहातच हात जोडून मुलायम यांचे आभार मानले. ‘आम्हाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हीच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हा’ असे विधान मुलायम यांनी मोदींकडे पाहून केले. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून मुलायम यांच्या विधानाचे स्वागत केले.