ग्रामस्थांनी बैठकीत बोलून दाखविले दोष; आमदार रविशेठ पाटील यांनी कामे वेळीच करण्याच्या दिल्या सक्त सूचना

पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणातील कामे वेळीच पूर्ण करण्याच्या सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 20) संबंधितांना दिल्या. महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम संपण्याऐवजी लांबत चालले आहे. त्यासंदर्भात आमदार रविशेठ पाटील यांनी गुरूवारी पेण प्रांताधिकारी कार्यालयात संबंधीत अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महामार्ग अभियंता अग्रवाल, महावितरणचे कनिष्ठ अभियंता उमाकांत सकपाळे, ज्येष्ठ नेते बाळाजीशेठ म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी खारपाडा ते नागोठणेपर्यंतच्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी महामार्गाच्या कामातील त्रुटींची यादी वाचून दाखविली. पेण शहरनजिकच्या फ्लायओव्हरमुळे नैसर्गिक पाणी अडले जात आहे. या ठिकाणी पाणी निचरा मार्ग, पेण रेल्वे स्टेशनसमोर वाहनांना ये-जा करण्यासाठी मार्गाची व्यवस्था नाही, वाशीनाका, डोलवी येथील ओव्हरब्रीज व गडब येथे हवे असणारे भूयारी मार्ग आदी समस्या व दोष त्या-त्या गावच्या ग्रामस्थ व सरपंचांनी या बैठकीत दाखवून दिले. त्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी महामार्ग अधिकार्यांची कानउघाडणी केली व पुढील महिन्याभरात सर्व त्रुटी संपविण्याचे आदेश दिले. त्यानंतर पेण तालुक्यातील वीज वितरणच्या अधिकार्यांसोबत ग्रामस्थांसोबत चर्चा घडवून आणली.