Breaking News

खोपोलीत दरड कोसळण्याची भीती कायम

पालिकेकडून सुरक्षित ठिकाणी वास्तव्याचे आवाहन

खोपोली ः प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील माळीन येथील भयानक दुर्घटनेनंतर केंद्रीय भूगर्भ तज्ज्ञांनी खोपोलीतील दरडग्रस्त सुभाषनगर, काजूवाडी, मोगलवाडी, यशवंतनगर आदी धोकेदायक रहिवाशी भागाची पाहणी केली. हा रहिवासी भाग धोकादायक असल्याचा अहवालही दिला. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली खालापूरचे तहसीलदार व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी या भागाची पाहणी करून शासन लवकरच याबाबत ठोस निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.
तहसीलदार आयुब तांबोळी, मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी या भागाची पाहणी केली. मागील सहा वर्षे फक्त पाहणीचे काम सुरु असून, आजपर्यंत येथील एकाही असुरक्षीत घराचे सुरक्षीत जागेत स्थलांतर किंवा प्रभावी उपाय झालेले नसल्याने या ही वर्षी येथे दरड कोसळण्याची भिती कायम आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात खोपोली नगरपालिका हद्दीतील सुभाषनगर, काजूवाडी, यशवंतनगर, सहकार नगर, वर्धमान नगर व मोगलवाडी या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यात अनेक घरांचे नुकसान होते. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे येथील धोकेदायक भागातील नागरिकांचे सुरक्षित जागेत स्थलांतर किंवा डोंगराला लागून मजबूत संरक्षक भिंत उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, मात्र अद्याप यापैकी एकाही उपाययोजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.
दुसरीकडे परिसर धोकादायक बनला असला तरी, येथील अवैध माती उत्खलन व डोंगर पोखरणे मात्र सुरूच आहे. संबंधित प्रशासन यंत्रणा मात्र आजही याबाबत फक्त पाहणी करून सुस्त असल्याचे दिसत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील सात-आठ हजार लोकवस्तीचा भाग डोंगराला लागून आहे. त्यांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे.

येत्या 8 ते 12 जूनदरम्यान कोकण भागांत जोरदार वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खोपोली पालिकेकडून सुभाषनगर, काजूवाडी व यशवंतनगर या दरडग्रस्त भागातील रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करण्याची नोटीस बजावली आहे. तसे जाहीर आवाहनही करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था नाही अशांना त्या त्या भागातील नगरपालिका शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

चक्रीवादळ व जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दरडग्रस्त भागातील रहिवाशांना तातडीने घरे खाली करून सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच पर्यायी व्यवस्थाही करण्यात येत आहे .
-अनुप दुरे, मुख्याधिकारी खोपोली

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply