Breaking News

हॉटेलच्या किचन एसीसाठी वीजचोरी

चोरी केलेल्या विजेचे बिल भरण्याचे आदेश; पनवेल महावितरणचा दणका

पनवेल : बातमीदार : हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या मोठ्या क्षमतेच्या फ्रीज, डीप फ्रीजरसाठी महावितरणची वीज चोरून वापरणार्‍या सुकापूर येथील हॉटेलचालक, बंगला आणि भाड्याने दिलेल्या घरांना वीज वापरणार्‍या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून वीजमीटरची गती 70 टक्क्यांनी कमी करणार्‍या वीजचोरांना पनवेल महावितरण विभागाने दणका दिला आहे. पनवेल शहर महावितरणने चोरी केलेल्या विजेचे बिल भरण्याचे आदेश दिले आहेत.

सुकापूर भागातील बालाजी ट्रान्सफार्मरवरून वीजचोरी होत असल्याचे अहवालात समजले होते. पनवेल शहर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांच्याकडे याची तक्रार आल्यानंतर त्यांनी बुधवारी कारवाई करून दोन वीजचोरांना रंगेहाथ पकडले. सुकापूर येथे हॉटेल व्हिलेज ढाब्याचा मालक नरेश शर्मा याने हॉटेलमधील पाच एसी, फ्रीज, डिप फ्रीजर आदी जास्त वीजवापर होणार्‍या उपकरणांसाठी महावितरणच्या कनेक्शनवरून थेट वीजचोरी केली होती. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार महावितरणने उघडकीस आणला. महावितरणने शर्माला एक लाख 54 हजारांचे बिल दिले आहे.

वीजचोरांना 48 तासांची मुदत देण्यात आली असून, बिल न भरल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. ही कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे आदींसह कर्मचार्‍यांचे पथक तैनात करण्यात आले होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply