Breaking News

भारताचा पहिला डाव 165 धावांत आटोपला

न्यूझीलंडला आघाडी, पण निम्मा संघ माघारी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात भारतावर आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 71.1 षटकांत 5 बाद 216 धावा केल्या असून, 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्माने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाला पहिल्या डावात झटपट माघारी धाडल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात फार समाधानकारक झाली नाही. टॉम लॅथम याला इशांत शर्माने 11 धावांवर बाद करीत पहिली विकेट घेतली. त्यानंतर टॉम ब्लंडल याला इशांतने बोल्ड केले. तो 30 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी तिसर्‍या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्याचे काम इशांतनेच केले. त्याने 100वी कसोटी खेळणार्‍या टेलरला 44 धावांवर बाद केले. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणार्‍या कर्णधार केन विलियम्सन याला मोहम्मद शमीने 89 धावांवर बाद केले. फिरकीपटू अश्विनने हेन्नी निकोल्सला 17 धावांवर बाद करीत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. खराब विद्युत प्रकाशामुळे दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला.
त्याआधी पहिल्या डावात भारतीय संघाला 165 धावांपर्यंत रोखण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले. पहिल्या दिवशी भारताचा निम्मा संघ गारद केल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारशी संधी न देता डाव झटपट गुंडाळला. भारताकडून अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज दिली. जेमिसन आणि टीम साऊदीच्या मार्‍यासमोर भारतीय फलंदाज टिकू शकले नाहीत.
दुसर्‍या दिवशीही भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ऋषभ पंत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नातबाद झाला. अजिंक्य रहाणे एका बाजूने झुंज देण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र 46 धावांची खेळी करून टीम साऊदीच्या गोलंदाजीवर तोही माघारी परतला. यानंतर मोहम्मद शमीने फटकेबाजी केली, मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेपटाला जास्त वळवळ करण्याची संधी दिली नाही. यजमान संघाकडून टीम साऊदी आणि जेमिसन यांनी प्रत्येकी चार, तर ट्रेंट बोल्टने एक बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply