मुरूड ः प्रतिनिधी : उसरोली ग्रामपंचायतीतर्फे 14व्या वित्त आयोगामधून पाच लॅपटॉप व दोन प्रिंटर्सचे ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड, उसरोली, वाळवंटी, पोफळी, सुमरादेवी व बेलीची आदिवासी वाडी भागातील जिल्हा परिषद शाळांना सरपंच मनीष नांदगावकर व उपसरपंच महेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंतनगर हायस्कूलला प्रोजेक्टर व स्क्रीनसुद्धा देण्यात आली.
साहित्य वाटप कार्यक्रम उसरोली ग्रामपंचायत प्रांगणात ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रदीप दिवकर, सदस्य नवनाथ तांबोळी, समिना घलटे, कल्पना म्हशीलकर, वृषाली नवघरकर, निकिता कोर्लेकर, शैलेश पाटील, संकेश पाटील, राजेंद्र बाजी, मंगल वाघमारे, संजना मोरे, शहनाज नाखवाजी, तंटामुक्ती अध्यक्ष दामोदर राऊत, फैरोज घलटे, मुश्ताक हसवारे, सज्जाद हसवारे, विनोद बाजी, हेमंत नांदगावकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेश मोठेबुवा, अनंत बुल्लू, महेश अमृते आदींसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर म्हणाले की, माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी शाळेच्या गरजेप्रमाणे आम्ही लॅपटॉप व प्रिंटर्सचे वाटप केले. सध्याचे युग स्पर्धात्मक असून माझ्या ग्रामपंचायत हद्दीमधील जिल्हा परिषद शाळा याकामी कमी पडता कामा नये यासासाठीच आम्ही सर्व सदस्यांनी सहकार्य करीत 14व्या वित्त आयोगामधून हा खर्च केला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबरच मराठी शाळासुद्धा उत्कृष्ठ ठरल्या पाहिजेत, अशी अपेक्षा या वेळी नांदगावकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड डान्स, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.