Breaking News

फणसाड अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरे गायब; मुरूड पोलिसांत तक्रार

मुरूड ः प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी वन्यजीव प्राण्यांच्या हालचाली तसेच अज्ञात शिकार्‍यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी फणसाड अभयारण्यात ठिकठिकाणी नाइट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या कॅमेर्‍यांसमोरून एखादा वन्यजीव अथवा अज्ञात व्यक्ती गेल्यास त्याचा फोटो कॅमेर्‍यात कैद होतो. त्यामुळे अशा कॅमेर्‍यांमुळे फणसाड अभयारण्यात अवैध शिकारीसारख्या प्रकारांना आळा बसवण्यात यश आले होते, मात्र काही दिवसांपूर्वी फणसाड अभयारण्यातील तीन ट्रॅप कॅमेरे अज्ञात व्यक्तीकडून गायब करण्यात आल्याचे निदर्शनास येताच फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी याबाबतची रीतसर तक्रार मुरूड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

सुप्रसिद्ध फणसाड अभयारण्य 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात व्याप्त असून, येथे बिबट्या, हरीण, भेकर, सांबर, ससा, रानगवा आदी वन्यजीव राहतात. सदर कॅमेरे चोरीप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवि कलम 379अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. सी. लवटे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. यातील एका कॅमेर्‍याची किंमत जवळपास 20 हजार रुपये असून तीन कॅमेर्‍यांप्रमाणे फणसाड अभयारण्य प्रशासनाचे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply