Breaking News

पेणमधील 23 इमारती धोकादायक!; घरे खाली करून पुनर्बांधणीचे पालिका प्रशासनाचे आदेश

पेण : प्रतिनिधी

शहरातील धोकादायक आणि अत्यंत धोकादायक इमारतींची यादी पेण नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये 10 अत्यंत धोकादायक तर 13 धोकादायक अशा एकूण 23 इमारतींचा समावेश आहे. धोकादायक इमारतींची डागडुजी आणि अत्यंत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करुन घेण्याचे आदेश नगर परिषदेने इमारतधारकांना दिले आहेत. सन 2020 मध्ये महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून 13 रहिवासी मृत्यमुखी पडले होते तर नऊ जण जखमी झाले होते. त्यानंतर  रायगड जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून दरवर्षी धोकादायक आणि अत्यत धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात येत आहे. पेण नगर परिषदेने केलेल्या सर्व्हेनुसार शहरात 10 अत्यंत धोकादायक आणि 13 धोकादायक इमारती आढळल्या आहेत. या इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असल्या तरी नगर परिषदेच्या आदेशांचे पालन आणि नोटीसीचे गांभीर्य किती इमारतधारक घेतात हेदेखील महत्त्वाचे आहे. अत्यंत धोकादायक इमारती आहेत त्या लवकरात लवकर खाली करा किंवा त्या पाडून त्यांची पुनर्बांधणी करा तसेच ज्या इमारती धोकादायक आहेत त्या इमारतधारकांनी संरचनात्मक इंजिनिअरच्या परवानगीने त्याची त्वरित डागडूजी करून घ्यावी असे आदेश पेण नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने दिले आहेत. ज्या अत्यंत धोकादायक इमारती जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पेण बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंचपाडा आदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या अत्यंत धोकादायक इमारतींचा विषय प्रशासन आणि इमारतधारक या दोघांनीही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अत्यंत धोकादायक इमारतींमध्ये आजही काही सदनिकाधारक अगदी निर्भिडपणे वास्तव्य करत असून नैसर्गिक आपत्तीत एखादी दुर्घटना घडली तर त्याचे परिणाम लक्षात घेऊन त्यांनी आजच योग्य तो विचार करणे गरजेचे आहे.

पेण शहरातील सर्व इमारतींचा आढावा घेतला असता आम्हाला 10 अत्यंत धोकादायक आणि 13 धोकादायक इमारती आढळल्या. या इमारतधारकांना आम्ही सतर्क केले असून अत्यंत धोकदायक इमारतधारकांना इमारत पाडून पुनर्बांधणी करण्याच्या सूचना तर धोकादायक इमारतधारकांना संरचनात्मक इंजिनिअरच्या परवानगीने  इमारतीची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-विनायक बनसोडे, बांधकाम अभियंता,पेण नगर परिषद

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply