300हून अधिक बोटी महिनाभरापासून किनार्यावरच
अलिबाग ः प्रतिनिधी
बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या 300 मासेमारी बोटी गेल्या महिनाभरापासून किनार्यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने यावर मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे. बिनबोभाट बेकायदा मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोलंबी, नल, तेल बांगडा यांसारख्या मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत, तर भविष्यात सुमारे 40 मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासंदर्भात सरकारने कडक कारवाई करून एलईडी पर्ससीननेट मासेमारी पूर्णपणे बंद केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचा निर्वाणीचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे. शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचबरोबर पर्सेसिन, बुलनेट पद्धतीने मासेमारी करण्यावरही प्रतिबंध केला आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर मच्छीमार पर्सनेट तसेच एलईडी दिव्यांचा वापर करून बेसुमार मासेमारी करीत आहेत. वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासनाने एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्यांवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही. अधूनमधून कारवाईचा फार्स केला जातो, परंतु ही कारवाई तात्पुरती असते. एलईडी मच्छीमारीमुळे पारंपरिक मच्छीमार बुडाला आहे. 40 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मासळी मिळत होती. सुरू असलेली एलईडी बंद झालीच पाहिजे. राज्य सरकारला जाग आलीच पाहिजे. जर असेच कायम राहिले तर आम्ही आत्महत्या करायची का, असा सवाल करून बळीराम पेरेकर यांनी राज्य सरकारच्या जीआरलाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे तीव्र आंदोलन करावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा दिला आहे.
मोठ्या भांडवलदारांचा समावेश
700 कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असणार्या रेवस बोडणी परिसरातील सुमारे 300 बोटी आहेत, मात्र बंदी असतानाही पर्सनेट आणि एलईडी मासेमारी करणार्या बोटींद्वारे मुंबई ते रत्नागिरी परिसरातील समुद्रात 12 नॉटीकल अंतराच्या आत आणि बाहेरही बेसुमार मासेमारी सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर पैसा दिसत असल्याने मोठे भांडवलदारही यात उतरले आहेत. त्यामुळे बंदी असली तरी कोणालाही न जुमानता मासेमारी केली जात आहे.