पनवेल : वार्ताहर : पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरींच्या घटनांत वाढ झाली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच त्यांचा एक आरोपी फरार झाला आहे त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
मल्लिकार्जून मठपती हे घरी जाण्यासाठी ओला टॅक्सीचे बुकींग त्यांच्या मोबाईल फोनवरुन करीत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलीवरुन आलेल्या दोघा जणांनी त्यांचा मोबाईल जबरीने काढून घेवून ते पसार झाले होते. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोलीस हवालदार राऊत, आयरे, थोरात, पोलीस नाईक वाघमारे, मोरे, पोलीस शिपाई गर्दनमारे, घुले यांच्या पथकाने सापळा रचून तसेच तांत्रिकदृष्ट्या माहिती घेवून व बातमीदारांच्या मार्फत आरोपी प्रतिक रामधारी नाविक उर्फ सोनी याला ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडून चोरीचा मोबाइल खरेदी करणारा मोहम्मद शहजादा रियाज खान (27) याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.