उरण : प्रतिनिधी, वार्ताहर : उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे सेकंडरी स्कूल चिरनेर या शाळेतील 1990 साली एसएससीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 30 वर्षांनंतर चिरनेर येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी यांच्या पुरणशेत येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात करण्यात आला.
30 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी एकत्र येण्यासाठी वर्गातील चार-पाच विद्यार्थ्यांनी एकमेकांना मोबाइलद्वारे संपर्क करून प्रथम व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. त्यांनतर चिरनेर, मोठेभोम कलंबूसरे, मोठीजुई व अन्य ठिकाणच्या मित्रांना संपर्क करून निसर्गाच्या सानिध्यात एकत्र जमण्याचे निश्चित करण्यात आले. याला सर्वांनी पाठींबा दिल्याने महिना भराच्या पाच माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, तब्बल 50 माजी विद्यार्थी या स्नेहमळाव्यास उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमात मोठी रंगत निर्माण झाली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेकंडरी स्कूल चिरनेर शाळेचे दहावी बॅचचे विद्यार्थी गणेश चिरणेरकर, प्रसाद फोफेरकर, जीवन केणी, सुभाष कडू यांच्यासह गुजरात राज्यात एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले मोहन ठाकूर यांच्यासह सर्वांनीच अधिक मेहेनत घेतली.