मुरूड : प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (पीएनआर)च्या समर्थनार्थ मुरूड तालुक्यातील नांदगाव व मजगाव येथे भव्य बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीत 80 ते 90 दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
वंदे मातरम, भारत माता की जय, सीएए कायदा लागू झालाच पाहिजे अशा घोषणा देत, तसेच एनआरसी आवश्यक आहे, पीएनआर कामकाजाचा एक भाग आहे असे सांगत बुधवार बाजारापासून रॅली निघाली. ती खारीकवाडा, मजगाव, कुंभारवाडा, नांदगाव कोळीवाडामार्गे फिरविण्यात आली. यामध्ये युवकांचा सहभाग अधिक होता. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश पाटील, शैलेश काते, संजय ठाकूर, संदेश पाटील, कुणाल गाणार आदी असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रॅलीचा समारोप आठवडे बाजारात करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सह व्यवसाय प्रमुख संजय ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत देश काही धर्मशाळा नाही. घुसखोर मग तो बांगलादेशी असो वा पाकिस्तानी अशा घुसखोरांपासून देशाच्या एकता व अखंडतेला धोका असल्याने देशाच्या रक्षणासाठी केलेले कायदे कोणा जाती-धर्माविषयी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय मुस्लिमांना यापासून कुठलाही धोका नसल्याने सांगून राजकीय हेतूने प्रेरीत होत आंदोलन करणार्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …
RamPrahar – The Panvel Daily Paper