Breaking News

मविआ सरकारकडून फसवणुकीची मालिका

देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकर्‍यांवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, मात्र असंवेदनशील असलेल्या राज्य सरकारकडून फसवणुकीची मालिका सुरूच असून, याबाबत आम्ही सरकारला जाब विचारून अधिवेशनात धारेवर धरणार आहोत, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 24) पत्रकारांशी बोलताना बोलून दाखविला. यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचारावर चर्चेची मागणी करीत सभागृह दणाणून सोडले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी फडणवीस यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य सदस्य सोबत होते.
फडणवीस म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांना चिंतामुक्त करू, त्यांचा सातबारा कोरा करू, अशी आश्वासने देण्यात आली होती, मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. 35 लाख शेतकर्‍यांची यादी तयार असल्याचे सांगून केवळ 15 हजार शेतकर्‍यांची नावे सरकार जाहीर करीत आहेत. राज्यात 43 हजार गावांपैकी केवळ 68 गावांतील शेतकर्‍यांची यादी आघाडी सरकार जाहीर करतेय. या सरकारने शेतकर्‍यांची मोठी फसवणूक केली असून, फसवणुकीची ही मालिका अद्याप सुरूच आहे.
राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याबाबतही फडणवीस यांनी लक्ष वेधले. महिला अत्याचार थांबावे यासाठी सरकारची संवेदनशीलता दिसत नाही, असे ते म्हणाले, तर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचा शब्द फिरवला असल्याचा आरोप या वेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार यावर चर्चा करण्याची मागणी करीत विरोधकांनी आक्रमक धोरण स्वीकारले. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांत या प्रश्नांवर तत्काळ चर्चेची मागणी भाजपने लावून धरली.
सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ‘वन्दे मातरम्’ने प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाज पुकारले. अध्यादेश पटलावर ठेवण्याच्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विषय उपस्थित केला. ‘मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्यापही शेतकर्‍यांना एकही पैसा मिळालेला नाही. कर्जमाफीच्या घोषणेमध्ये स्पष्टता नाही. दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. यासंबंधी तत्काळ चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजप सदस्य उभे राहून घोषणाबाजी करू लागले. याचदरम्यान अध्यादेश व पुरवणी मागण्या सादर झाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी विधानसभा सदस्य पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य सदस्यांनी शोकप्रस्तावावर आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकप्रस्ताव संमत झाल्यावर अध्यक्ष नाना पटोले यांनी पूर्णवेळेसाठी बैठक स्थगित होत असल्याचे जाहीर केले.
विधान परिषद सभागृहात सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी कर्जमाफीवर चर्चा घेण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधी सदस्य संतप्त झाले. या धामधुमीत पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply