Breaking News

महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात उरणमध्ये भाजपचे धरणे आंदोलन

तालुकाध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी

उरण : प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) उरण तहसील कार्यालयावर उरण भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका अध्यक्ष रवि भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घोषणांची पूर्तता न करता शेतकर्‍यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर ढासळती कायदा-सुव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना महाविकास आघाडी सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये निर्णयक्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारला जाब विचारण्यासासाठी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून 400 तहसील कार्यालयांवर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे पडसाद उरणमध्येही उमटल्याचे दिसून आले.उरणचे आमदार महेश बालदी यांच्या भाजप कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. पुढे स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, बाजारपेठ, पुढे तहसील कार्यालय येथे जाऊन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा संगीता पाटील, तालुका उपाध्यक्ष दीपक भोईर, पंडित घरत, प्रकाश ठाकूर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, नगरसेविका जान्हवी पंडित, आशा शेलार, दमयंती म्हात्रे, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, रायगड (उत्तर) ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, कामगार नेते सुरेश पाटील, तालुका युवा अध्यक्ष शेखर तांडेल, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, फुंडे ग्रामपंचायत सरपंच जयवंती म्हात्रे, परशुराम म्हात्रे, जसखार ग्रामपंचायत सरपंच दामू घरत, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर,  पाणजे ग्रामपंचायत सरपंच हरेश्वर भोईर, तसेच राणी म्हात्रे, सुरज म्हात्रे, दिनेश रमण तांडेल, प्रदीप नाखवा, प्रदीप ठाकूर, सुचिता पाटील, शेखर पाटील, रूपेंद्र ठाकूर, मेघनाथ म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र घरत, अजय म्हात्रे, समीर मढवी, तेजस पाटील, अनिल पाटील, दिनेश मधुकर पाटील, सुनील घरत, मिलिंद पाटील, देवेंद्र पाटील, नित्यानंद भोईर, सोनारी ग्रामपंचायत सदस्य जगदिश म्हात्रे, जितेश कडू, चंद्रकांत कडू, अनंत कडू, दिलीप कडू, दिलीप तांडेल तसेच भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीकेची झोड उठवली, तसेच या वेळी उपस्थितांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

निवेदनात केलेल्या मागण्या

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणे, महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी कठोर कायदा करणे, कर्नाळा बँक घोटाळ्यातील बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाला उरण तालुक्यातील असलेल्या कर्नाळा बँकेच्या शाखेतून येथील ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यास भाग पाडावे, सरकारने गुन्हा दाखल केलेल्या कर्नाळा बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, थांबविण्यात आलेली विकासकामे पुन्हा सुरू करावीत व सरपंच आणि नगराध्यक्ष या महत्त्वाच्या निवडणुका थेट जनतेमधूनच व्हायला हव्यात, आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे दिले.

धरणे आंदोलनाचे नवी मुंबईतही पडसाद

नवी मुंबई : बातमीदार

राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध म्हणून नवी मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (दि. 25) तुर्भे येथील सर्कल तहसील कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले.  त्यामध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही. वचन दिल्याप्रमाणे अवकाळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. राज्य सरकारने शेतकर्‍यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे महाविकास आघाडी सरकारला जाब विचारून तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply