Breaking News

जिताडा व्हिलेज शहापूरला हवाय पाणंद रस्ता

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग म्हटले की जिताडा मासा सर्वांना आठवतो. तालुक्यातील खारेपाट भागात जिताड्यांची शेती केली जाते. खारेपाटातील घराबाहेर किंवा घरामागे जिताड्यांचे तलाव पाहायला मिळतात. शहापूर गावात पूर्वपार जिताडापालन केले जाते. जिताड्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. गावात अशी 103 तळी आहेत. या सर्व तलावांना जोडणारा पाणंद रस्ता गावात तयार करावा, अशी मागणी शहापूर ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून खारेपाटात भातशेतीला पर्याय म्हणून जिताडा मत्स्त्यशेती सुरू करण्यात आली आहे. अतिशय संघर्षमय परिस्थितीत हा व्यवसाय तरुण उद्योजक करीत असून, एक हेक्टरात किमान तीन लाखांचे उत्पन्न घेत आहेत. या सर्व तलावांपर्यंत पोहचण्यासाठी उन्हाळी बांधावरून व पावसाळी चिखल तुडवत जावे लागते. त्यामुळे पर्यटकांची इच्छा असूनही ताजे मासे खाण्यासाठी तलावापर्यंत जाता येत नाही. तसेच रस्ता नसल्याने ताजे मासे बाजारापर्यंत पोहचवता येत नाहीत. जिताडा व्हिलेजमागे जिताडा विक्री व गृहपर्यटन असा दुहेरी उद्देश आहे. या संकल्पना वास्तवात आणण्यासाठी 103 तलावांना जोडणारा पाणंद रस्ता गावात तयार करावा, अशी ग्रामस्थांची शासनाकडे मागणी आहे. पाणंद रस्त्याचा नियोजित मार्ग तसेच नकाशा ग्रामस्थांनी तयार केला असून, तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार अलिबागच्या तहसीलदारांनी नियोजित रस्त्याचे सर्वेक्षण व स्थळ पाहणी डिसेंबर महिन्यातच केली आहे. याकामी लक्ष घालून आमच्या गावातील व कोकणातील पहिला पाणंद रस्ता करण्यासाठी आवश्यक तो निधीदेखील द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply