दक्षिण रायगड भाजपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
पाली ः प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती व सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील 14 विजयी सरपंच व 168 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सुधागड झाप येथे रविवारी (दि. 25) करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची चित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी प्रतिभासंपन्न व बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या अचूक निर्णय व कृतिशील धोरणाने भारताचे नाव मोठे केले. त्याचप्रमाणे देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाने जगात भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. यापूर्वी शिवसेनेने आम्हाला निवडणूक लढविण्यासाठी अडवणूक केली होती, मात्र भाजपने निवडणुका लढवून जिंकून दाखवल्या. केंद्र सरकारच्या योजना गावागावापर्यंत पोहचत आहेत. भाजपचे 2014 साली 282 खासदार होते, 2019 साली 303 खासदार निवडून आले. देशातील जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला. 2014पासून केंद्रातील एकही मंत्र्याने भ्रष्टाचाराच्या मुद्दावर राजीनामा दिला नाही, असे पारदर्शक सरकार मोदी राबवित आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्याला बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्या व भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून विकासाला गती द्या, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले. सबका साथ सबका विकास होताना सबका प्रयास महत्वाचा आहे. आपली सर्वांची साथ महत्त कवाची आहे. धन्यवाद मोदी अभियान राबवून सरकारने केलेल्या कामाबाबत जनतेच्या प्रतिक्रिया घ्या. बूथ कमिटीमध्ये जो कार्यकर्ता अधिक वेळ पक्ष संघटना बलाढ्य व मजबूत करण्यास देईल, त्यास पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी जाहीर केले. भाजप उपजिल्हाध्यक्ष राजेश मपारा म्हणाले की, भाजचे सरपंच व सदस्य हे सुशिक्षित व सुसंस्कृत आहेत. विकासदृष्टी जनहीताची भावना असल्याने जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून यापुढेही लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे तळागाळात राबवूया व येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व सिद्ध करूयात असे आवाहन केले. अविनाश कोळी म्हणाले की, सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगा व यापुढेही जास्तीत जास्त सदस्य नोंदणीवर भर द्या, असे आवाहन कोळी म्हणाले. कार्यक्रमासाठी सतीश धारप, युवानेते वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपीन म्हामूणकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंढे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वैशाली मपारा, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया गुंठे, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तळा तालुकाध्यक्ष निलेश रातवडकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, गीता पालरेचा, आरती भातखंडे, सचिन मोदी, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, रमेश साळुंके, खरोशी सरपंच रुपाली महेश पाटील, विकास माने, आलाप मेहता, सागर मोरे, प्रदीप तिवारी, आनंद लाड, श्रेयस कदम, तिरतराव पोलसानी, अनिल पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन
बूथ कमिटीमध्ये जो कार्यकर्ता अधिक वेळ पक्ष संघटना बलाढ्य व मजबूत करण्यास देईल, त्यास पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी जाहीर केले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्या, असे आवाहनही प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले.