कर्जत : बातमीदार
नेरळ जवळील जिते येथे राहणारे आरपीआय (आठवले गट)चे कोकण विभाग संघटक मारुती गायकवाड यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. 12) रात्री चोरी झाली. पोलिसांनी श्वान पथक बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मारुती गायकवाड यांच्या जिते गावातील बंगल्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी मंगळवारी रात्री 3 ते सकाळी 7 यावेळेत लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची साखळी, सोन्याची कर्णफुले आणि सोन्याची गंठन असा एकूण 1 लाख 33 हजारांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी जाग आल्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे मारुती गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यानंतर पत्नी चंद्राबाई यांनी पोलीस पाटील पंकज पाटील यांना बोलावून घेत चोरीची माहिती पोलिसांना दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी तात्काळ अलिबाग येथून श्वान पथकाला पाचारण केले. पुढील तपास उपनिरीक्षक रतीलाल तडवी करीत आहेत.